Sunday, April 27, 2008

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या...

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?

कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही गडे,
पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - उंबरठा (१९७७) राग - पटदीप (नादवेध)

Tuesday, April 15, 2008

मालवून टाक दीप..

मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग !
राजसा किती दिसांत लाभला निवांत संग !

त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात;
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग !

गारगार या हवेत, घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !

दूरदूर तारकात बैसली पहाट न्हात:
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !

हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?

काय हा तुझाच श्वास ? दर्वळे इथे सुवास !
बोलरे हळू उठेल चांदण्यावरी तरंग !


गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगशकर

भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे...

गीत - ग्रेस
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

हे भलते अवघड असते

हे भलते अवघड असते ......

गाडी सुटली रुमाल हलले क्षणात डोळे टचकन् ओले,
गाडी सुटली पडले चेहरे क्षण साधाया हसरे झाले,
गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना,
अंतरातली हळवी माया तुटू दे म्हटले तरी तुटेना,
का रे इतका लळा लवुनी नंतर् अ मग ही गाडी सुटते ,
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते,
गाडी गेली फ़लाटावरी आठवणींचा कचरा झाला,
गाडी गेली डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला....

हे भलते अवघड असते, कुणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना,
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना,
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखूनी कंठी,
तुम्ही केविलवाणे हसता, अन् तुम्हास नियती हसते,
हे भलते अवघड असते ..........

तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी,
वाऱ्यावर फडकवताना,पायाची चालती गाडी,
ती खिडकीतून बघणारी,अन् स्वतःमधे रमलेली,
गजरा माळावा इतुके, ती सहज अलविदा म्हणते,
हे भलते अवघड असते ..........

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू,
इतक्यात म्हणे ती माझ्या, कधी गावा येशील का तू,
ती सहजच म्हणुनी जाते, मग सहजच हळवी होते,
गजऱ्यातील् होन कळ्या अन्, हलकेच ओंजळीत देते,
हे भलते अवघड असते ..........

कळते की गेली वेळ, ना आता सुटणे गाठ,
अपुल्याच मनातील स्वप्ने, घेउन मिटावी मुठ,
हि मुठ उघडण्यापुर्वी चल निघूया पाऊल म्हणते,
पण पाऊल निघण्यापूर्वी, गाडीच अचानक निघते,
हे भलते अवघड असते ..........

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी,
ओठांवर शील दिवानी बेफिकीर पण थरथरती,
पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले,
मित्रांशी हसताना ही, हे दुःख चरचरत असते,
हे भलते अवघड असते ..........

गीत - संदीप खरे
अल्बम - आयुष्यावर बोलू काही (२००३)

नसतेस घरी तू जेव्हा..

नसतेस घरी तू जेव्हा..
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !



गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर - सलील कुलकर्णी
अल्बम - आयुष्यावर बोलू काही (२००३)