Thursday, May 29, 2008

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळयाची जणू साऊली

धूळ उडिवत गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घूमे राऊळी

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळया चाहूली

माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी

गीतकार :सुधीर मोघे
गायक :आशा भोसले
संगीतकार :श्रीधर फडके

Monday, May 26, 2008

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा

गीतकार :सुधीर मोघे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके

मोगरा फुलला, मोगरा फुलला

मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला

इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी

मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला

गीतकार :संत ज्ञानेश्वर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर