Thursday, July 18, 2013

वादळवाट

थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्‍नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत

कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वार्‍यापावसाची गाज काळे भास गच्‍च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट

गीत - मंगेश कुळकर्णी
संगीत - अशोक पत्की
स्वर - देवकी पंडित,  स्वप्‍नील बांदोडकर

आई कुणा म्हणू मी

आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई ?
इतुकेच सांगण्याला येशील का ग आई ?

तोडीत ना फुलाला वेली स्वये कधीही
सोडून तू मुलाला गेलीस का ग आई ?

रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही
बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई ?

चुकतो अजून मी गे म्हणतो तुला मी आई
चुकलीस तू परि का होऊन माझी आई ?

आई तुझी आठवण येते

आई तुझी आठवण येते
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते

वात्सल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते

आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें

हांक मारितो 'आई' 'आई', चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली का नच कानीं येते

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें जागीं तडफड करतें

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं पुसुनी लोचनें मातें
गीत - बाळ कोल्हटकर
संगीत - भालचंद्र पेंढारकर
स्वर - भालचंद्र पेंढारकर
नाटक-दुरितांचे तिमिर जावो (१९५७)