Wednesday, August 27, 2008

भेटला बाप्पा..

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप


मी हसले उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं
'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं '
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'

'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव '
'देशील आणून परत माझी हरवलेली नाती '
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती '

'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं '
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं '
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर '
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार '

'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला

- Deepa Mittimani

Monday, August 18, 2008

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो..

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो.

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो.

- संदीप खरे

आयुष्या वर बोलू काही......

जरा चुकीचे... जरा बरोबर......
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ....
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ....
नको-नको से हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

"उदया-उदया" ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
"उदया-उदया "ची कीती काळजी , बघ रांगेतुन....
"परवा" आहे "उदया"च नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

- संदीप खरे

Friday, August 15, 2008

जयोऽस्तु ते!

जयोऽस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे
स्वतन्त्रते भगवती त्वामहम् यशोयुताम् वन्दे

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची

मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

-विनायक दामोदर सावरकर