मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.
मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो.
डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.
मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो.
- संदीप खरे
Monday, August 18, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment