Wednesday, March 26, 2008

जगणे म्हणजे उधळित जाणे

आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

घनधारांतुन ख्याल ऐकतो रंगुनि मल्हाराचा
बघता बघता मोरपिसारा सार्या संसाराचा
मनात पाउस बरसे उधळित मातीचा मधुगंध
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

दुःखाला आधार नको का? तेहि कधितरी येते
दोस्त हौनी हातच माझा अपुल्या हाती घेते
जो जो येइल त्याचे स्वागत, दार न कधिही बंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधि चंद्र होऊनी हासे
सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

कधी कुणाचे आसू पुसता बोतंनी हळुवार
हात होतसे वाद्य : सुरांचे पाझरती झंकार
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद
जगणे म्हणजे उधळित जाणे ह्र्दयातिल आनंद

(तुझे गीत गाण्यासाठी)

No comments: